बहुजननामा ऑनलाईन – स्वित्झर्लॅंड सेनेतील महिला सैनिकांना आता पुरूषांचे अंर्तवस्त्र वापरण्यापासून मुक्ती मिळाली आहे. सेनेत महिला सैनिकांच्या भरतीवर अधिक भर देण्यात आल्याने स्वित्झर्लॅंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला सैनिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वित्झर्लॅंडच्या संरक्षण मंत्री विओला अमहर्ड यांनी महिला सैनिकांसाठी वेगळ्या अंडरविअर तयार करण्याच्या योजनेचे स्वागत केले आहे.
आतापर्यंत स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांना लूज फिटिंग असलेले अंडरविअर दिले जात होते. हे स्विस महिला सैनिकांसाठी फारच अडचणीचे आणि अवघड ठरत होते. स्विस राष्ट्रीय परिषदेतील एक सदस्य मरिअन्न बिंदेर म्हणाले की, सेनेचे कपडे पुरूषांसाठी डिझाइन केले आहेत. पण जर सेना खरेच महिलांच्या अधिक भरतीवर भर देत असेल तर योग्य ती पावले उचलावी लागतील. तसेच महिलांचे नवीन कपडे त्यांना सेनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील.
सेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात उन्हाळ्यात महिलांना शॉर्ट अंडरविअर आणि हिवाळ्यात लांब अंडरविअर दिले जातील. 2004 पासून स्वित्झर्लॅंडमध्ये महिला आणि पुरूष सैनिक एकसारखी ड्युटी करत आहेत. एक महिला सैनिक म्हणाली की, नवीन अंडरविअर मिळाल्याने त्यांना जास्त वजन घेऊन उंच ठिकाणी चढण्यास सोप होईल. तसेच अनेक अडचणीही दूर होतील. सध्या स्वित्झर्लॅंडच्या सेनेत 1 टक्के महिलांचा समावेश आहे. येणाऱ्या 20 वर्षात स्वित्झर्लॅंडच्या सेनेत महिला सैनिकांची संख्या 10 टक्के करण्यावर भर दिला जात आहे.