पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे कॅम्प परिसरातील ‘फॅशन स्ट्रीट’ला शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. यामध्ये येथील सर्व दुकाने जळून खाक झाली होती. या अग्नितांडवात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले तर अनेक लहान मोठे व्यावसायिक रस्त्यावर आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) ‘फॅशन स्ट्रीट’ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्व परिसराचे पुढील तीन दिवसांत मूल्यमापन करा, त्याविषयीचा अहवाल शुक्रवारी द्या, त्यानंतर लवकरच बैठक घेऊ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी मध्यरात्री ‘फॅशन स्ट्रीट’ला लागलेल्या आगिमध्ये सर्व दुकाने आगिच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम उपस्थित होते. अजित पवार यांनी आग लागलेल्या दुकानाची पाहणी करुन नुकसान झालेल्या दुकानदारांसोबत संवाद साधला.
यावेळी व्यावसायिकांनी अजित पवार यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिला. ‘फॅशन स्ट्रीट’ला लागलेल्या आगीच्या घटनेचे येत्या तीन दिवसांत मूल्यमापन करा, शुक्रवारी अहवाल दिल्यावर बैठक घेऊ, असे अजित पवार यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. या घटनेमुळे बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाच्या तोंडचा घास हिरावला आहे.
मार्च 2020 मध्ये लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर इतर व्यावसायाप्रमाणे येथील व्यवसाय देखील सुरु करण्यात आले. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून पुन्हा व्यवसाय सुरु केला होता. व्यवसाय व्यवस्थित सुरु असताना कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दुकानदारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन होतो की काय अशी भीती होती. त्यातच आग लागून दुकान जळून खाक झाले. 2020 मध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठी आर्थिक झळ बसली असताना आगिच्या घटनेमुळे व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे.