सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – तब्बल 11 वेळेस आमदार होऊन रेकॉर्ड केलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेतला आहे. प्रकृती साथ देत नाही त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गणपतराव देशमुखांबद्दल सांगयचे झाले तर राहणी एकदम साधी रहाणी. तब्बल 54 वर्षे त्यांनी सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. परंतु यंदाची विधानसभा निवडणूक मात्र ते लढवणार नाही. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी स्वत: याबाबत घोषणा केली आहे. सांगोला तालुक्यातील कोळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते निवडणूक लढवणार नसले तरी शेकापचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणपतराव देशमुख यांनी शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला होता. गणपतरावांनी 94 हजार 374 मते मिळवली होती. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्याने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे.
गणपतराव देशमुख यांच्याविषयी थोडक्यात…
गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असलेल्या गणपतरावांनी 1962 साली सांगोल्यातून पहिली निवडणूक लढवली होती. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळला तर प्रत्येक निवडणुकीत गणपतरावांनी विजय मिळवला आहे. उल्लेखनीय बाब अशी की, 2012 मध्ये गणपतरावांना आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाली होती. यावेळी सभागृहासह सरकारनेही गणपतरावांचा गौरव केला होता.