मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ब्रिटनमधून येणारी विमानं केंद्र सरकारनं 23 डिसेंबरपासून बंद केली आहेत. परंतु आज आणि उद्या मुंबईत 5 विमानं येणार आहेत. अंदाजे यात 1000 प्रवासी असणार आहेत. त्यांच्यासाठी ट्रायडंट आणि ताज अशा हॉटेलमध्ये 2000 रूम बुक करण्यात आल्या आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली आहे.
चहल यांन सांगितलं की, राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. लंडनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेनं तयारी केली आहे. आज रात्री 2 फ्लाईट येणार आहेत. उद्या सकाळी 2 फ्लाईट आणि रात्री 11 वाजता एक येणार आहे. यातील संशयित प्रवाशांना थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे. यासाठी तिथं 100 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. या प्रवाशांना बेस्ट ट्रान्सपोर्ट करणार आहे.
नव्या संचारबंदीत रात्री 11 पर्यंत कोणताही नियम बदलेला नाही. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध असतील. नववर्षातही काळजी घ्यावी लागेल. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवरही नियंत्रण ठेवावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चहल यांनी असंही सांगितलं की, परवापासून लंडनहून येणारी विमानं बंद होतील. मात्र उर्वरीत युरोपमधील देशांमधून विमानवाहतूक सुरूच राहणार आहे. यामुळं या प्रवाशांना सक्तीचं क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन नाही, नाईट कर्फ्यु आहे हे लक्षात घ्यावं असंही त्यांनी नमूद केलं.