मुंबईः बहुजननामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेचा आजवरचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या ‘कोस्टल रोड’चे काम नेमक कस? आणि कुठपयर्यंत आले आहे ? याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे. मुंबईची ओळख ठरणारा हा प्रकल्प दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईत बोरीवलीपर्यंतचा असून आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण आहे. जुलै 2023 पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास येईल, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.
प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वांद्रे-वरळी सीलिंक अशा पहिला टप्प्यातील काम सध्या सुरु असून यासाठी 12,721 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत यासाठी 1281 कोटीचा खर्च झाला आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम खरतर 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कोरोना संकटामुळे काम रखडल्याने आता ते जुलै 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे आयुक्त चहल म्हणाले.
कोस्टल रोडसाठी 175 एकर अरबी समुद्राखालील जमिनीवर भराव टाकला असून आणखी 102 एकर जमिनीवर भराव टाकला जाणार आहे. समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे तयार केले जाणार असून हे देशातील सर्वाधिक रुंदीचे ठरणार आहेत. बोगद्याचे काम 7 जानेवारीपासून सुरु होणार असल्याचे चहल यांनी सांगितले. बोगदा तयार करणाऱ्या मशीनला मावळा असे नाव दिले आहे. मरीन लाइन्स ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत 1, 920 मी लांबीचे दोन बोगदे ‘मावळा’ मशीनमधून तयार केले जाणार आहेत. ‘सीआरझेड’च्या मंजुरीसाठी मुंबई हायकोर्टाने 2019 मध्ये कोस्टल रोडच्या कामावर स्थगिती आणली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाल्याचे आयुक्त चहल यांनी सांगितले.