बहुजननामा ऑनलाईन – संशयास्पद हालचालींवरुन उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका बुरखाधारी व्यक्तीला वाहतुक पोलीसांनी पकडले. मात्र बुरखा काढताच बुरख्यात महिला नसून एक तरुण असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बुरखा घालण्याचे कारण ऐकताच वाहतुक पोलीसांनी तर डोक्यालाच हात लावला.
तरुणाने सांगितले की, बुरखा घालून प्रेयसीला भेटायला जात होतो. बुरखा असेल तर तिच्या घरच्यांना संशय येत नाही. त्याच्या या उत्तराने पोलीसही चकित झाले. तर बघ्यांच्या गर्दीत हशा झाला. वाहतुक पोलीसांनी तत्काळ त्याच्या घरच्यांना फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतले आणि पुन्हा अशी चूक न करण्याच्या अटीवर त्याला समज देऊन घरच्यांच्या ताब्यात दिले. मात्र रस्त्यावर हे सर्व होत असताना बुरखा घातलेला तरुण पाहताच गर्दीतील लोकांनी त्याचे फोटो काढून घेतले. या सर्व प्रकारात त्याला प्रेयसीला तर भेटता आले नाही. मात्र प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते याचे हे उदाहरण नक्कीच लक्षात ठेवण्यासारखे असेल.