पुणे (लोणी काळभोर) : बहुजननामा ऑनालाइन – विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारास हॉर्न दिल्याच्या किरकोळ कारणावरून पाठलाग करून पंधरा जणांच्या टोळक्याने श्रीगोंद्याचे माजी आमदार शिवाजीराव नागवड यांचे नातू पृथ्वीराज राजेंद्र नागवडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. हा प्रकार लोणी काळभोर जवळील कवडी पाठ टोल नाक्याजवळ शनिवारी रात्री घडला. यातील दोन आरोपींनी आज (रविवारी) पहाटे पोलिसांनी अटक केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज रविंद्र नागवडे (वय – 25 रा.वागदरी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या इनोव्हा गाडीतून पुणे सोलापूर महामार्गावरुन शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना मांजरी गावच्या हद्दीत असलेल्या भारत पेट्रोलपंपासमोर असलेल्या रस्ता दुभाजकाशेजारी एक दुचाकीस्वार उभा होता. त्यामुळे त्यांनी हाॅर्न वाजवला. याचा राग आल्याने त्याच्यात वाद झाला. किरकोळ मारहाण झाली. त्यानंतर त्या दुचाकीस्वाराने आपल्या साथीदारांना फोन करुन हा प्रकार कळवला. त्यावर त्याचे मित्र दुचाकीवरुन या गाडीचा पाठलाग करत कवडीपाट टोलनाक्यावर आले. तेथे या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान करत नागवडे यांना 1) निलेश दिवेकर व 2) त्याचे वडील व त्यांचे मित्र 3) सागर मुळे, 4) विनोद ढोरे, 5) शुभम हरपळे, 6) महेश डोमाले, 7) विराज हरपळे, व पाच ते सहा अनोळखी इसमांना सोबत घेऊन बेदम मारहाण केली. यामध्ये पृथ्वीराज नागवडे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले बाकीचे पळून जाण्यात यशस्वी झाले. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.