कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाइन – ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या पद्मावत चित्रपटाचे पन्हाळा परिसरातील मसाई पठारावर शूटिंग सुरू होते. त्यावेळी पेट्रोलचे गोळे टाकून सेट पेटवल्या प्रकणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुख्य संशयितास अटक केली आहे. राजेश देरन्ना बंगेरा (वय ५०, रा. बंगळुरु-कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे.
या प्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सेट पेटविण्याचा कट बंगळुरुमध्ये रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मसाई पठारावरील ‘पद्मावत’ चित्रपटाचा सेट उभा करण्यात आला होता. राजस्थानबरोबर कोल्हापुरातही या चित्रपटाच्या चित्रीकरणाला विरोध झाल्याने देशात खळबळ उडाली होती. १४ मार्च २०१७ रोजी मध्यरात्री हा सेट अज्ञात जमावाने पेट्रोल बॉम्बने पेटवून दिला होता. तसेच जमावाने जनरेटर व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड करीत सुरक्षारक्षकास मारहाण केली. त्यामध्ये राजू, आवदेश व फैयाज हे कामगार जखमी झाले होते. आगीमध्ये ७०० ते ८०० किमती पोशाख, चित्रीकरणाचे साहित्य असे सुमारे १ कोटीचे नुकसान झाले.
या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात अज्ञात १० ते १५ रजपूत लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी निर्माता चेतन भालचंद्र देवळेकर (वय ३४, रा. माहीम, मुंबई) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दीडशे संशयित लोकांकडे चौकशी केली होती. हा सेट पेटविण्याची रेकी राजेश बंगेरा याने केल्याची प्राथमिक माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती.