अनूपपूर : वृत्तसंस्था – प्रेयसीला महागडया भेटवस्तू देता यावे म्हणून एकाने आपल्या जीवलग मित्राची दगडाने ठेचून हत्या करून त्याच्याजवळील दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन पसार झाला होता. मात्र चौकशीत आरोपीचे पितळ उघड पडलं आणि पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. छत्तीसगडच्या भालूमाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
राहूल असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. आसिफ खान असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 1 फेब्रुवारी रोजी आपला मित्र राहूल याच्यावर दगडाने हल्ला करून त्याच्याजवळील दागिने आणि मोबाईल घेऊन पसार झाला. त्यानंतर जखमी राहूलला लोकांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा 21 मार्च रोजी मृत्यू झाला.
या घटनेचा तपास करताना राहुलला सर्वात शेवटी त्याचा मित्र आसिफ खान भेटल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, आपल्या प्रेयसीला महागडे गिफ्ट देऊन खूश करण्यासाठी त्याने मित्र राहुलची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरु केली आहे.