नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये पीएफ PF म्हणजे भविष्य निर्वाह निधीचा नोकरदारांना मोठा हातभार लागला आहे. पूर्वी केवळ लग्न, मुलांचे शिक्षण किंवा मेडिकलसाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा पर्याय दिला जायचा. परंतु. आता मात्र अनेक कारणांसाठी पीएफमधील PF रक्कम काढता येते. अलीकडेच ईपीएफओकडून सुविधा सुरु करण्यात आली असून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपणाला ईपीएफओकडून १ लाख रुपयांची आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे हि रक्कम घेताना कोणत्याही गॅरंटीची अर्थात हमीची आवश्यकता राहणार नाही. १ जूनला ईपीएफओने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. कोरोनासारख्या कोणत्याही गंभीर आजारासाठी पगारादार व्यक्तीला १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मेडिकल अॅडव्हान्सच्या रुपात दिली जाणार असल्याचे ईपीएफकडून जारी केल्या परिपत्रकात म्हंटले आहे.
मेडिकल अॅडव्हान्स कोण घेऊ शकेल ?
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी ईपीएफ खात्यातून आगाऊ रक्कम घेण्यास परवानगी देण्यात आली होती.
मात्र त्यासाठी वैद्यकीय खर्चाच्या अंदाजाच्या आधारे किंवा वैद्यकीय बिले दयावी लागत होती. मात्र आता आगाऊ रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतेही बिल किंवा कॉस्ट प्रोजेक्शन सादर करण्याची आवश्यकता नाही.
फक्त एका अर्जाद्वारे तुम्हाला १लाख रुपये मिळू शकतात. महत्त्वाचे म्हणजे आपण जर रुग्णालयात असला तर कोणीही हे काम करू शकेल.
अर्ज केल्यानंतर आठवड्यातील कुठलाही कामकाजाचा दिवस असेल त्याच दिवशी काही तासातच हे पैसे मिळतात.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीच्या सुरुवातीच्या काळात हे पैसे खूप उपयोगी ठरत असल्याने गेल्या महिन्यात ईपीएफओ बोर्डाने याला मंजुरी दिली.
तुम्हाला हे पैसे कसे मिळतील ?
पीएफच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारकास रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर खातेधारक व्यक्तीला सरकारी किंवा केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत अंतर्भूत असलेल्या रूग्णालयात दाखल केले असेल तरचा १ लाखाच्या अॅडव्हान्स रक्कमेवर दावा करू शकतो.
खासगी रुग्णालयात दाखल केलेले असल्यास काही तपासणी केली जाते आणि त्या तपासणीनंतर पैसे मिळतात. रुग्णाच्या कुटूंबातील सदस्याला एक पत्र द्यावे लागते त्यामध्ये बेड नंबर, प्रिस्क्रिप्शन यासारखी माहिती द्यावी लागेल. याशिवाय अंदाजित रक्कम दयावी लागेल. महत्वाचे म्हणजे पैसे मिळ्वण्यासष्ठी किचकट प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही.