Yogesh Kadam on Sanjay Raut | ‘बाळासाहेब ठाकरे असते, तर पायताणाने मारले असते’; मंत्री योगेश कदम यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

नाशिक : Yogesh Kadam on Sanjay Raut | ”संजय राऊत यांनी स्वत: मिठाचा खडा टाकून शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती तोडली. पंचवीस वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली युती संजय राऊत यांच्यामुळेच तुटली आहे. आज ते काँग्रेससोबत आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी यांना पायताणाने मारले असते. इतरांबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही काय केले, हे आरशात पाहा,” असा घणाघात राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला.
नाशिक दौऱ्यावर असताना कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात मिठाचा खडा टाकला. ते एकत्र येऊ नयेत, यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. याबाबत योगेश कदम यांनी सांगितले की, ज्यांनी शिवसेना भाजपची युती तोडली आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली, त्यांना इतरांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. आपण स्वत: काय केले हे राऊतांनी पाहावे.
दरम्यान, नाशिक महापालिकेत शिवसेनेचे ३५ नगरसेवक होते. त्यापैकी २८ नगरसेवक पुन्हा एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासामुळे शिवसेनेत परतले आहेत. अनेकांना शिवसेनेत येऊन काम करण्याची इच्छा आहे. परंतु, गुन्हेगारी प्रवृत्तींना शिवसेनेत प्रवेश नसल्याचे पक्षाचे धोरण आहे. पक्षात येणाऱ्यांची चाचपणी करूनच त्यांना प्रवेश दिला जात असल्याचे योगेश कदम या वेळी म्हणाले.