कोलकाता : बहुजननामा ऑनलाईन – अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रिपदी राहिलेले यशवंत सिन्हा Yashwant Sinha यांनी पश्चिम बंगाल निवडणुकांच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यशवंत सिन्हा 2014 पासून प्रमुख मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी बिहार निवडणुकीतही एनडीए सरकारविरुद्ध मोहीम चालवली होती. उत्तर प्रदेश निवडणुकीतही त्यांनी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांच्यासोबत व्यासपीठावरून प्रचार केला होता.
Kolkata: Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool Congress, ahead of West Bengal Assembly elections pic.twitter.com/K3s9TQNPlS
— ANI (@ANI) March 13, 2021
आज सकाळी त्यांनी तृणमूलच्या मुख्यालयात त्यांनी डेरेक ओ ब्रायन, सुदीप बंदोपाध्याय आणि सुब्रत मुखर्जी यांच्या हजेरीत पक्ष प्रवेश केला. यानंतर तृणमूलकडून याची माहिती माध्यमांना देण्यात आली.
यशवंत सिन्हा यांनी बिहारमधील हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. हा मतदारसंघ आता झारखंडमध्ये आहे. 2004च्या लोकसभा निवडणुकीत ते हजारीबाग मतदारसंघातून पराभूत झाले. तथापि, पुढच्या वर्षी 2005 मध्ये ते पुन्हा संसदेत पोहोचले. यानंतर 2009 मध्ये त्यांनी भाजप उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
यशवंत सिन्हा मूळचे पाटण्याचे रहिवासी आहेत. तेथेच त्यांचे शिक्षण झाले. 1958 मध्ये त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर 1960 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळत 24 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली. त्यानंतर यशवंत सिन्हा यांनी 1984 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतून राजीनामा देऊन जनता पक्षाचे सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. चार वर्षांनंतर 1988 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.