नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर आता आणखी एका नव्या आजाराने सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. कोरोना उपचारादरम्यान स्टिरॉईडचा अमर्यादित वापर झाल्याने म्युकरमायकोसिस या आजाराचे संक्रमण राज्यात झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत नागपुरात 7 जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तर याच आजाराचे संक्रमण झालेले 300 पेक्षा अधिक रुग्ण सध्या शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने ही माहिती दिली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विदर्भात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नागपुरात आहेत. त्यामुळे बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. काळ्या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांपैकी 129 रुग्णांवर जबडा, डोळे, कान- नाक- घशासह इतरही काही शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यातील सर्वाधिक 43 रुग्ण हे एकट्या मेडिकलमध्ये उपचाराला आले होते. तर सेव्हन स्टार रुग्णालय 42 शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय 34, न्यूरॉन मिलेनियन रुग्णालयात 33, मयोत 19, न्यू ईरा रुग्णालय 16, अॅरियन्स इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंसेस 10 अर्नेजा हार्ट इन्स्टिट्युट 8 रुग्णांनी म्यूकरमायकोसिसचे उपचार घेतले होते. दरम्यान कोविडवर मात केलेल्या रुग्णांमध्ये म्युकरचे संक्रमण वाढत असताना त्यावरील औषधांचाही तुटवडा जाणवत आहे.