नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने मंगळवारी सांगितले की, जगातील कोणत्याच देशात कोरोनाशी दोन हात करण्याची हर्ड इम्युनिटी सारखी परिस्थिती अद्याप तरी निर्माण झाली नाही, त्यामुळे लस येण्याची वाट पाहणे हा एकमेव पर्याय आता जगासमोर उरला आहे. आमच्या देशात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे असा दावा करणाऱ्या देशांकडे दुर्लक्ष करत जागतिक आरोग्य संघटनेने सर्वाना काल धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनावर लस येईपर्यंत ही परिस्थिती हाताळणे खूप अवघड असल्याचे सांगितले. 20 ते 40 या वयोगटातील युवकांना संक्रमणाचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे त्यामुळे त्यांना सावध राहण्याचे निर्देश WHOने दिले आहेत.
WHO नुसार एकट्या अमेरिकेत एक कोटी 15 लाख लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर यामध्ये 4 लाख लोकांचा मृत्यू होण्याचा धोका आहे. ब्रिटनच्या काही शास्त्रज्ञांनी दावा केला होता की तिथल्या लोकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढत आहे. ब्रिटनच्या लोकांना थंडीमुळे सर्दीचा कायम असणाऱ्या संमरामानामुळे त्यांच्यात आधीच प्रतिकार क्षमता जास्त असल्याचे सांगितले जाते. आणि त्यामुळेच ते कोरोनाचा सामना करू शकतील असा विश्वास त्यांना वाटतो.
WHO ने सांगितले की रोग प्रतिकार क्षमता फक्त लसीमुळेच वाढवता येईल. काही वैज्ञानिकांच्या मते तर जगातील 70% लोकांमध्ये तरी या अँटीबॉडी तयार झाल्या पाहिजे. तर काहींच्या मते जगातील अर्ध्या लोकांमध्ये जरी अँटीबॉडी तयार झाल्या तर कोरोनावर मात करता येऊ शकते.
‘आता रोग प्रतिकार क्षमता नाही तर लस पाहिजे’ असे वक्तव्य WHO चे प्रमुख डॉक्टर मायकल रेयन यांनी केले. मंगळवारी एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, प्रतिकार शक्ती वाढेल या आशेवर राहून चालणार नाही, त्यासाठी लस महत्वाची आहे.
ते म्हणाले हर्ड इम्युनिटी म्हणजे कोरोनावरील समाधान नाही, किंवा ठरुही शकत नाही त्यामुळे ही भाबडी अशा सोडून द्यायला पाहिजे. आत्तापर्यंत अशी माहिती समोर आली आहे की फक्त 10 ते 20% लोकांमध्येच अँटीबॉडी आहेत. पण एवढ्या कमी अँटीबॉडी असल्या म्हणजे हर्ड इम्युनिटी असत नाही असं त्यांनी यावेळो बोलताना सांगितलं.
काय आहे हर्ड इम्युनिटी ?
हर्ड इम्युनिटी चा अर्थ सोप्या भाषेत असा सांगता येईल की, जर कोणता संसर्गजन्य आजार पसरला तर त्याच्या विरोधात लढण्यासाठी शरीरात तयार झालेली प्रतिकार शक्ती. अशा प्रकारे त्या आजाराला रोखण्यासाठी मदत होऊ शकते. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे त्यांच्या शरीरात या अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे ही संक्रमणाची साखळी तोडण्यास मदत होते.