बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात हाहाकार सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध उठवण्यास विविध देशांनी घाई केल्यास मोठे घातक परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी पत्रकार परिषदेत इशारा दिला आहे.
जगभरातील लॉकडाऊन हटवावे अशी सगळ्यांसारखीच आमचीही इच्छा आहे. परंतु घाईने लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होती. जर योग्य पद्धतीने कोरोना व्हायरसचा सामना केला नाही तर त्याचे घातक परिणाम होतील. युरोपात कोरोनाचा मोठा फटका बसलेले देश स्पेन आणि इटली लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करत असून लोकांना कामावर जाण्याची परवानगी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा दिला आहे. टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाऊन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे. काही ठिकाणी कोरोनाचा फैलाव वाढत असल्यामुळे त्यांनी काळजी न घेतल्यास धोका वाढण्याचे संकेत दिले आहेत.