भीलवाडा : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या भीलवाडामधील लॉकडाऊनची परिस्थितीची पाहणी करण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून फिरत होते. मात्र, रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलने जिल्हाधिकाऱ्यांना अडविले आणि विचारले कुठे निघालाय तुम्ही? महिला पोलिसाच्या तत्परतेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही थांबावेच लागले. ज्यावेळी हे जिल्हाधिकारी आहे हे समजले त्यावेळी त्या घाबरल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यानी या महिला पोलिसांचे कौतुक केले.
गुलमंडी परिसरातुन जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम. नकाते सायकलवरून फेरफटका मारत होते. त्यांनी टी शर्ट घातल्याने कोणीही त्यांना ओळखले नाही. दरम्यान याच परिसरात महिला पोलीस कर्मचारी निर्मला स्वामी आपले कर्तव्य बजावत होत्या. स्वामींना सायकलवरून एक व्यक्ती फेरफटका मार्ट असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी त्या व्यक्तीला अडवले. नकाते यांना विचारले, तुम्ही कुठे जात आहात, घरीच राहा ना, भाई. हा सर्व प्रकार सुरु असतानाच तेथे एक बंदूकधारी कर्मचारी पोहोचला अहो मॅडम, कुणाला थांबवत आहात… हे जिल्हाधिकारी आहेत, असे तो म्हणाल्याने काही वेळ महिला कॉन्स्टेबल घाबरून गेल्या. परंतु, जिल्हाधिकारी नकाते यांनी हा प्रसंग अगदी सहजतेने घेत, या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले.