बहुजननामा ऑनलाईन – बॅंका नेहमी त्यांच्या ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याबाबत सांगत असतात. मात्र काहीजण निष्काळजीपणाने व्यवहार करुन पैसे गमावून बसतात. अशीच एक घटना मुंबईतील पवईमध्ये घडली आहे. यूपीआय (युनिफाई पेमेंट इंटरफेस) चा वापर करुन बिअर खरेदी करणाऱ्या एका महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ८७ हजार रुपये काढून घेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने गुगलवर मुंबईतील पवई भागातील स्टार वाईन शॉपसाठी नोंदणी केलेल्या क्रमांकावर कॉल केला. दुकानदाराने तिला फोनवर गूगल पेद्वारे ४२० रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर तिचा यूपीआय आयडी शेअर करण्यास सांगितले. या सर्वांसाठी तिने गूगलवर सर्च करुन हा क्रमांक काढला होता. तिने आयडी शेअर केल्यानंतर त्या महिलेला पेमेंट रिक्वेस्ट मिळाली आणि विनंती मिळताच तिच्या खात्यातून एकाच वेळी २९,००१ रुपये वजा झाले. खात्यातून इतके पैसे वजा झाल्याने तिने पुन्हा वाईन शॉपवर फोन करून चौकशी केली. यावेळी दुकानदाराने माफी मागत चुकीने असे घडले असल्याचे सांगितले. हा कॉल डिस्कनेक्ट होताच महिलेच्या खात्यातून पुन्हा ५८ हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज आला.
या घटनेबाबात पोलिसांनी सांगितले की, ही महिला दारूच्या दुकानात जाब विचारण्यासाठी पोहोचली तेव्हा दुकानदाराने सांगितले की, तिने ज्या नंबरवर कॉल केला तो नंबर त्याच्या शॉपचा नाही. या प्रकरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. अशाप्रकारे मुंबईतील साकीनाका येथील २३ वर्षीय अनिल पदम सिंहनेदेखील मोबाइलच्या ईएमआय संदर्भात फायनान्स फर्मवर कॉल केला असता, त्याच्या खात्यातून एक लाख रुपयेही काढून घेण्यात आले. ऑनलाईन फसवणूकीला आळा घालण्यासाठी गुगल आपला व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी अॅपवर सूचना आणि एसएमएस पाठविते, ही विनंती मान्य केल्यास ते पैसे बँक खात्यातून जमा केले जातील. मात्र ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी प्रत्येकाने सावधान असेणेही गरजेचे आहे.