रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – एक लाखांची लाच स्विकारल्याने अलिबाग येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिका-यासह लेखापालास अटक केली आहे. अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 4) दुपारी एक वाजता ही कारवाई केली. गेल्या पंधरा दिवसात लाच स्विकारल्याप्रकरणी सरकारी अधिका-यावर कारवाई करण्याची ही अलिबागधील तिसरी घटना आहे.
रायगड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला सदाशिव पाटील, कंत्राटी लेखापाल भूषण रामचंद्र घारे अशी आराेपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी एंटरप्राइजच्या वतीने सरकारी कृपा महिला वसतिगृह कर्जत आणि सरकारी कृष्ठरोगी भिक्षेकरी गृह कोलाड येथे अन्न धान्य पुरवण्यात आले हाेते. याबाबतची बिले मंजूर करण्यासाठी आरोपीने तक्रारदाराकडे तब्बल 4 लाख 10 हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली हाेती. त्यानुसार मंगळवारी दुपारी एक वाजता सापळा लावण्यात आला. पहिला हप्ता म्हणून आरोपीने 1 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे.