नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – वाळूचा ट्रक sand truck अडवल्याने भाजप नगरसेवकाने महिला तलाठीला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. नंदूरबार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संबधित नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपी नगरसेवकाला अटक करावी या मागणीसाठी महिला तलाठ्यासह अन्य अधिकारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते.
या प्रकरणी तलाठी निशा पावरा यांनी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार नंदूरबारमधील भाजप नगरसेवक गौरव चौधरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाकडे गुजरातहून महाराष्ट्रात वाळू वाहतूक करण्यासंबंधिचा परवाना नव्हता.
त्यामुळे तलाठी निशा पावरा यांनी वाळूचा ट्रक दोन तास अडवला होता.
दरम्यान चालकाने वाळूचा ट्रक sand truck पळवून नेण्याचाही प्रयत्न केला.
त्यामुळे तलाठी यांनी आपल्या अन्य दोन सहकारी महिलांसोबत पाठलाग करून हा ट्रक पकडला. घटनेची माहिती मिळताच ट्रकचे मालक नगरसेवक गौरव चौधरी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी महिला तलाठ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली.
त्यानंतर चौधरी यांनी तलाठी निशा पावरा यांना मारहाण केली.
या घटनेनंतर तलाठी आणि अन्य अधिकाऱ्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जाऊन नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.