मुंबई बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप शिवसेना महायुतीला शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून सोबत घेणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना दिली. धर्मनिरपेक्षतेला विरोध करणाऱ्या शक्तिंविरोधात असलेले संविधानी पक्ष प्रक्रियेचा आदर करतात. अशा पक्षांना एकत्र करणार असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणूकीत वंचितला आम्ही सोबत घेतले नाही. त्यामुळे ९ जागा गमवाव्या लागल्या. परंतु यावेळी वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच राज ठाकरे यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी कॉंग्रेससोबत राज्यात युतीबाबत चर्चा झालेली नव्हती. तसेच यावेळी केवळ ईव्हीएमबाबात चर्चा केली. मनसेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. तो आल्यास केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविला जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसची कामगिरी आणि पक्षांतर्गत नाराजीबाबत भाष्य त्यांनी केले. तर आगामी निवडणूकीत लोकसभेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीसह मनसेला सोबत घेतानाचे नियोजन कसे असेल याचीही त्यांनी माहिती दिली.