मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून मुंबईत नाईटलाईफ सुरु करणार असल्याची चर्चा होती. पण आता त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली असून २६ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. पब आणि बारसाठी नवीन नियम नसून पूर्वीप्रमाणे दीड वाजेपर्यंतची मर्यादा कायम राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. दरम्यान त्यांना मुंबईप्रमाणे पुण्यातही नाईट लाईफ सुरु करण्याच्या प्रस्तावाबद्दल विचारले असता त्यावर त्यांनी खूपच मजेशीर उत्तर दिले.
पुण्यातील लोकं १ ते ४ दरम्यान झोपतात किंवा १ ते ४ या वेळेवरून पाट्या किंवा पुणेकरांबद्दल जोक्स व्हायरल होत असतात. तेव्हा मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पुण्यात नाईट लाईफ सुरु करण्याबद्दल विचारले असता ‘पुण्यात आधी आफ्टरनून लाईफ सुरु करतोय’ असे हास्यास्पद उत्तर दिले. त्यांच्या या उत्तरावरून चांगलाच हशा पिकाला.
दिवाळी आणि गणपती अशा सणांवेळी आपण रात्र-रात्र फिरत असतो. नाईट लाईफ सुरु केल्याने अनेक जण तीन शिफ्टमध्ये काम करणे शक्य असून महसूल आणि नोकऱ्यांमध्येही वाढ होणार आहे. आतापर्यंत पोलीस दीड वाजेपर्यंत दुकाने खुली आहेत की बंद हे पाहण्यासाठी फिरत होते. त्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करायचे असून त्यांना खरे पोलिसांचे काम करायला देणार असल्याचे आदित्य यांनी म्हटले.