सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – अशी चर्चा आहे की, नारायण राणे भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत परंतु काही कारणाने त्यांचा भाजप प्रवेश लांबला आहे. दरम्यान युतीबाबतही अजून निर्णय झाल्याचं दिसत नाही. अशात आता आपल्या लांबलेल्या भाजप प्रवेशाबाबत आणि भाजप-सेना युतीबद्दल नारायण राणे यांनी स्वत: खुलासा केला आहे. पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित आहे असं त्यांनी म्हटलं आहे. एका मुलाखतीत ते बोलत होते.
‘पक्ष विलीन करून मी भाजपमध्ये प्रवेश करणार’
नारायण राणे म्हणाले की, “मी भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर माझा विश्वास आहे. आमच्या संघटनेचे आमदार भाजपच्या तिकीटावरच लढणार आणि पक्ष विलीन करून मी भाजपमध्ये प्रवेश करणार. ” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कोकणात पोहोचली तेव्हा नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात त्यांचं स्वागत केलं.
‘जिथे मी आहे, तेच पारडं जड…’
राणेंना प्रश्न विचारण्यात आला की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात पक्षप्रवेश का नाही केला. असा प्रश्न विचारल्यानंतर राणे म्हणाले, “भाजप प्रवेश मुंबईतच व्हावा अशी माझी इच्छा आहे. तो लवकरच होईल.” इतकेच नाहीतर भाजप-सेना युती झाली तर सिंधुदुर्गात राणेंचंच पारडं जड असणार असा दावाही त्यांनी यावेळी केली. “जिथे मी आहे, तेच पारडं जड आहे. आमचाच आमदार भाजपच्या तिकीटावर लढणार.” असं त्यांनी स्पष्ट केलं.
‘युती झाली किंवा नाही, तरी फरक पडत नाही’
युतीनंतर कणकवलीची जागा कोणाला मिळणार या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले, “युती झाली किंवा नाही, तरी फरक पडत नाही. तो माझा प्रश्न नाही. माझा भाजप प्रवेश नक्की आहे. माझे कार्यकर्तेही माझ्याबरोबर पक्षप्रवेश करणार. मी ज्या पक्षात असेन तेच पारडं जड असणार.”