पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यातील शिरूर मधील एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्देवी घटना घडली आहे. तेथील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर काही तासातच त्यांच्या पत्नीनेही आपला प्राण सोडला आहे. केवळ ३ तासाच्या कालावधीत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात आणि कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. किसन भालेराव (वय, ८७) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शिरूर येथील इनामगावात ही घटना घडली. किसन भालेराव हे एक शेतकरी आहेत. भालेराव हे नेहमीप्रमाणे बैलगाडी जुंपत होते. त्यावेळी तेथे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे घरच्यांना काही न समजताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार केले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय परत घरी परतले. अजूनही सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय शोक व्यक्त करत होते.
भालेराव यांचा मृत्यू होऊन अवघे ३ तास नाही झाले तोवर तसेच, घरातील सदस्यांचे अश्रूही पुसले नाहीत. तोपर्यंत किसन भालेराव यांच्या कुटुंबीयावर काळाने दुसरा घात केला. भालेराव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला तणाव सहन न झाल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या दोन मृत्यूनंतर भालेराव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.