नाशिक : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपूर्वी हिंगणघाट येथे प्राध्यापक तरुणीला जाळून दिल्याची घटना घडली असताना आता नाशिकमध्ये एका विधवा महिलेला जिवंत जाळले असल्याची घटना घडली आहे. बस स्थानकावर चार आरोपींनी महिलेला पेटवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिक येथील लासलगावात बस स्थानक भागात चार-पाच तरुणांनी महिलेला पकडत तिला शिवीगाळ केला. नंतर तिच्या अंगावर रॉकेल टाकत तिला पेटवून दिले. महिलेला पेटवून दिल्यानंतर तरुणांनी तिथून पळ काढला. पण नंतर स्थानिकांनी तातडीने धावत येऊन आग विझवली आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले.
ही महिला ४० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच पीडित महिला लासलगावजवळील पिंपगाव येथे राहणारी होती. तिला नाशिकच्या एका जिल्हा रुग्णलयात दाखल केले आहे, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून फरार झालेल्या इतर तरुणांचा शोध सुरु आहे.
मुलींना जाळून देण्याच्या घटना सतत घडत असून अहमदनगरमध्येही एका तरुणाने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. निरंजन नाईक या तरुणाने अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला असून, कौटुंबिक वादामुळे त्याने हा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी त्याची तक्रार दाखल करून न घेतल्याने त्याने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे. दरम्यान उपस्थित असलेल्या लोकांनी आग विझवल्याने तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर शासकीय रुग्णलयात उपचार चालू आहेत.