नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज वाढ होत आहे. शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 42 हजार 790 रुपये तर चांदी प्रति किलो 48 हजार 376 रुपये होती. एका आठवड्यात प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1800 रुपयांनी वाढला आहे. सोन्याची ही दरवाढ अनेकांना आचंबित करणारी आहे. सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याचे प्रमुख दोन कारणे आहेत.
यंदाच्या वर्षी जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या भावामध्ये 7 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार कोरोनाव्हायरसचा परिणाम आता दिसू लागला आहे. एका मोठ्या रिसर्च फर्माच्या अहवालानुसार कोलमडलेल्या जागतिक बाजारामुळे गुंतवणूकदार सेफ इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे सोने खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना व्हायरसचा चीनच्या विकासावर परिणाम झाला असून अन्य देशांच्या आर्थिक प्रगतीवरही मर्यादा येऊ शकतात असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने दिला आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. चीनच्या बाहेर कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरक्षित गुंतवणूकीला गुंतवणूकदारांचे पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे अमेरिकन डॉलरची मागणी वाढली आहे. डॉलच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात होणाऱ्या सोन्याची किंमत वाढली आहे. जीएसटीमुळेही या दरात आणखीनच वाढ होत आहे.
या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ होऊन दर 1 हजार 625.05 प्रति औस आहे. शनिवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 0.40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बुधवारी मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 450 रुपयांनी वाढ झाली होती.