बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाने जगभरामध्ये कहर केला आहे. अनेक देशांनी लॉकडाऊनसारख्या उपाययोजना करूनही कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. मध्यतरीच्या काळात कोरोनाचा जोर ओसरला होता. मात्र आता मागील महिन्यापासून पुन्हा बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर एका चर्चेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकारी मारिया वान केरखोवे यांनी कोरोनाबाबत जगाला इशारा दिला आहे. जगात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. येत्या काही दिवसात महासाथीचा आजार वेगाने वाढत जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मागील आठवड्यात कोरोनाचे ४४ लाख रुग्ण आढळले असल्याचे सांगत मारिया म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंलबजावणी करूनही १६ महिन्यांनंतर इतकी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येकाने खबरदारी घेण्याबरोबरच या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कोणती पावले उचलावीत यावर अधिक गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. जगभरात बाधितांमध्ये ९ टक्क्याची वाढ झाली असून बळींच्या संख्येतही पाच टक्के अधिक वाढ झाली आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १३.५८ कोटींहून अधिक झाली आहे. तर, २९ लाख ३० हजाराहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक बाधित असून भारत दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानी ब्राझील आहे.