मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे विधानसभा निवडणुकीच्या धुमश्चक्रीनंतर प्रथमच गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. धनंजय मुंडे हे कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांबाबत समजल्यानंतर धनंजय यांनी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केल्याचे म्हटले आहे. परंतु, शुभेच्छा स्वीकारताना त्यांनी खोचक टोलाही आपल्या भगिनी पंकजा यांना लगावला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात धनंजय मुंडे बोलत होते. ते म्हणाले, आजपर्यंत मला त्यांच्या शुभेच्छा मिळाल्या नव्हत्या. कालही मला त्या ऐकायला मिळाल्या नाहीत. माध्यम आणि सोशल मीडियातून मला याबाबत समजले. त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्याचा मला आनंद आहे. शेवटी उशिरा का होईना, वामनभाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गहिनीनाथ गडावर, त्यांना मला शुभेच्छा देण्याची सुबुद्धी झाली, मला या गोष्टीचा आनंद आहे. त्या शुभेच्छा मला सर्वसामान्य माणसांची सेवा करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देत राहतील, असे टोला धनंजय मुंडे यांनी शेवटी लगावला.
शुक्रवारी गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमातील शुभेच्छांचा स्वीकार धनंजय मुंडेंनी केल्यानंतर पत्रकारांनी पंकजा यांना प्रतिक्रिया विचारली असता ती देण्यास त्यांनी नकार दिला. नो कमेंट म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण-भावामध्ये अटीतटीची लढत झाली. यावेळी असंख्या आरोप-प्रत्यारोपही झाले. शेवटी धनंजय मुंडे यांनी मंत्री असलेल्या पंकजा मुंडे याचा पराभव केला. यामुळे पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला होता. या काळातील राग अजूनही कायम असल्याचे पंकजा मुंडे यांच्या या प्रतिसादावरून दिसून आले.
Visit : bahujannama.com