मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत झालेली चर्चा सकारात्मक आहे. या महाआघाडीत राज ठाकरे आल्यास आघाडीला मोठा फायदा होईल असे मत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये होणाऱ्या आघाडी बाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करण्यासाठी झालेली चर्चा सकारात्मक आहे. इतकेच नव्हे तर, या महाआघाडीत राज ठाकरे आल्यास आघाडीला मोठा फायदा होईल असे म्हंटले आहे.
आगामी निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी व्हावी यासाठी काल ( २९ जानेवारी ) प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्या बैठकी दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी १२ जागांची मागणी केली. मात्र प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या मागणीला काँग्रेसने आक्षेप घेत नकार दिला होता.
दरम्यान मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ६ जागा देण्यास तयार असल्याचे समोर आले होते. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीत १२ जागांसाठी आग्रह धरला आहे. तसेच काल झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना आम्ही १२ जागांच्या मागणीवर ठाम आहोत. त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही. एमआयएमशी युतीबाबत कारण नाही. कारण एमआयएम आता जागा लढणार नाही. असे त्यांनी म्हंटले होते.
विशेष म्हणजे निवडणुकीनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे आम्हाला व्हायचे नाही. आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हाच असून तो मान्य करुन घेण्याची हीच योग्य वेळ आहे. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेसशी आघाडीबाबत आरएसएसच्या मुद्द्यावर प्रतीक्षा करू, असे त्यांनी जाहीर केले. याचबरोबर पुण्यात वंचित आघाडीच्या सुकाणू समितीची बैठक सुरू असून या बैठकीत काय निर्णय होतो, तो श्रीरामपूरच्या सभेत जाहीर करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले होते.