नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जुने व्हर्जन असलेल्या काही स्मार्टफोनमध्ये 1 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअॅप रन होणार नसल्याने लाखो युजर्सला याचा फटका बसणार आहे. अशा युजर्सना नवीन फोन खरेदी करणे हा पर्याय आहे. परंतु, हा पर्याय खर्चिक ठरणार आहे. जगभरातील सुमारे 75 लाख स्मार्टफोन युजर्सना याचा फटका बसणार आहे. यूजर्सना व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आता 1 फेब्रुवारीपूर्वी आपला स्मार्टफोन अपग्रेड करावा लागेल. या बदलाबाबत व्हॉट्सअपने अगोदरपासूनच आपल्या युजर्सना कळविले आहे.
या स्मार्टफोनमध्ये चालणार नाही
* आयओएस 7 आणि त्याहून जुन्या आयओएस आयफोनमध्ये
* अँड्रॉइड 2.3.7 आणि त्याहून जुने व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनमध्ये
आमच्यासाठी खुपच कठीण निर्णय
जुन्या स्माटफोनला सपोर्ट बंद करण्याबाबत स्पष्टीकरण देताना व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, पुढील 7 वर्षांचा विचार करता, सर्वाधिक यूजर्स असलेल्या ऑपरेटिंग सिस्टम्सवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. ज्या जुन्या व्हर्जनच्या स्माटफोनचे व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होत आहे, त्यांचे व्हॉट्सअॅपच्या प्रवासात खूप मोठे योगदान आहे. मात्र, नवनवीन फीचरला ते डिव्हाईस सपोर्ट करत नाहीत. म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आमच्यासाठी हा निर्णय खूप कठीण होता. परंतु, यूजर्सना चांगला अनुभव देणे हे सुद्धा महत्वाचे असल्याने हा निर्णय घेणे आवश्यक होते.
विंडोज ओएससाठी सपोर्ट यापूर्वीच बंद
यापूर्वी विंडोज स्मार्ट फोनसाठी व्हॉट्सअॅपने 31 डिसेंबर 2019पासून सपोर्ट बंद केला आहे. 31 डिसेंबर 2019 पासून विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टम वापरू शकणार नाही आणि व्हॉट्सअॅप मायक्रोसॉफ्ट स्टोरवरही उपलब्ध नसेल, असे पत्रक जारी करून कंपनीने युजर्सना पूर्वकल्पना दिली होती.