बहुजननामा ऑनलाइन टीम – आपलं इंग्रजी व्यवस्थित नाही हे तिच्या लक्षात आलं. इंग्रजी आलं तर जग जिंकू आणि आपली छाप पाडू असं पूजाला वाटायचं म्हणूच ती इंग्रजी शिकण्यासाठी बीड जिल्ह्यातून थेट पुण्यात आली होती. बीड जिल्ह्याच्या परळीतील पूजा चव्हाण (वय,२२) या तरुणीने पुण्यातील वानवडी येथे आत्महत्या केली. मात्र तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण लागलं आहे. तर तिच्या आत्महत्येनंतर काही ऑडिओ क्लिप्ससमोर आल्या आहेत, यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच तिच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेच्या एका मंत्र्याचं नाव पुढे आले आहे. पूजा चव्हाण नेमकी कोण होती? ती पुण्यात का आली होती? हे पाहा.
मूळची बीडची असणारी पूजा चव्हाण वयवर्षे २२ या तरुणीला स्टार व्हायचं होतं. तिला खूप मोठं व्हायचं होतं. तशी ती टिकटॉक स्टारही झाली होती. परंतु तिला समाजासाठी देखील काम करायचं होतं. त्यामुळे ती सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची. आपल्या बंजारा समाजाच्या विकासासाठी काम करायचंय असं ती नेहमी सांगायची. तसेच इंग्रजी शिकण्यासाठी पुण्याची वाट धरलेली पूजा चव्हाण पुण्यात आली. पण दोन आठवडेही राहिली नाही तोच तिनं आत्महत्या केली.
पूजा चव्हाण सोशल मीडियावर चांगली सक्रीय होती. बंजारा समाजाच्या अनेक कार्यक्रमांना ती उपस्थित असायची. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये तिला रस असायचा. पूजा ही तरुणाईत प्रसिद्ध असलेल्या टिकटॉक अॅपवरही खूप लोकप्रिय झाली होती. टिकटॉकवर ती सातत्यानं व्हिडिओ टाकायची. तिथं तिचा मोठा फॅन फॉलोइंग होता. तस्सेच ती अनेक तरुणींची ती रोल मॉडल झाली होती. कारण बंजारा समाजातून पुढे येऊन तिनं आपली स्वत:ची अशी वेगळी खासियत निर्माण केली होती. अनेक तरुणींनाही पूजा सारखं व्हावंसं वाटायचं.
दरम्यान, इंग्रजी बोलता यावं, समाजासमोर काहीतरी करुन दाखवावं आणि स्टार व्हावं अशी स्वप्न बाळगलेल्या पूजानं सारंकाही सुरळीत सुरू असताना आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं? यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. आत्महत्या करण्यापूर्वी ती कसली तरी उपचार घेत होती, अशी माहितीत पुढं येत आहे. मात्र, ती कसली उपचार घेत होती हे अद्यापतरी उघड झालेलं नाही. त्यामुळे पुजाचं आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय होतं? तिच्या मनात काय होत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.