मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सध्या फेसबुकवर एका फोटो शेयर होतो आहे. त्या फोटोमध्ये त्यांनी आपल्या आईला जिल्हाधिकारी कार्यालयात आणलं असून ते स्वत: खुर्चीवर बसले आहेत. तर, कलेक्टर मुलाच्या खांद्यावर आईने आपला मायेचा हात ठेवला आहे. ही पोस्ट दुसरी कोणाची नसून झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेयर केली आहे. या फोटोतील कलेक्टर मुलाचे डोळे आणि कलेक्टर मुलाचं ऑफिस पाहून भारावलेल्या आईच्या चेहऱ्यावरील भावनाच या फोटोमध्ये सर्वकाही सांगता आहेत.
या फोटोसोबतच #तिलाकायवाटत_असेल?” या टॅगलाईनने एक लेख लिहिला आहे. यामध्ये आपल्या अडाणी आईने कशाप्रकारे जिल्हाधिकारी मुलगा घडवला, याच वर्णन घोलप यांनी केलं आहे. अशिक्षित असणाऱ्या आईने पोरांना शिकवण्यासाठी गावोगावी फिरून बांगड्या भरल्या. पतीला दारू पिण्याचं व्यसनआहे हे समजल्यानंतर कुटुंबाच्या भविष्याचा विचार करत ती कणखर बनली. पतीच्या निधनानंतरही तिने बांगड्या विकण्याबरोबरच मजुरीही सुरु केली आणि मुलांना घडवले. दोन्ही मुलांचं डीएड शिक्षण पूर्ण केलं. मुलांना शिक्षक बनविण्याचं स्वप्न बनवणाऱ्या आईनं मुलाची शिक्षणातील गोडी लक्षात घेऊनआपल्या रमूला थेट जिल्हाधिकारीचं बनवलं.
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे मूळ निवासी असलेल्या जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी लिहिलेली ही कथा कित्येकांचे डोळे पाणावते आहे. त्यामुळेच, अनेकांनी हा फोटो शेअर करुन साहेबांच्या कार्याला सॅल्युट केला आहे. रमेश घोलप यांनी २०१२ मध्ये आयएएसची परीक्षा क्रॅक केली होती. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या या आयएएस अधिकाऱ्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली. त्यानंतर, कित्येक अधिकारी सोलापूर जिल्ह्यात घडले आहेत.