पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. पूर्व मोसमी पावसाने अनेक जिल्ह्यांध्ये हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्याला तर अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. अद्यापही अवकाळी पावसाचे संकट टळलेले नाही. पुणे शहर आणि जिल्ह्यात आज (सोमवार) दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह तुरळ ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. भारतीय हवामान खात्याने आज ‘एलो अलर्ट’ दिला आहे.
पुणे जिल्ह्यात आणि शहरात रविवारी सायंकाळी साडेचारपर्यंत 26.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारी आकाश काळ्या ढगांनी व्यापले. सोसाट्याच्या वारा सुरु झाला आणि पाठोपाठ ढगांचा गडगडाट झाला. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, कोथरुड, पाषाण या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
मंगळवार (दि.4) दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहील. संध्याकाळी अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानंतर बुधवारपासून ते शनिवारपर्यंत गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.