नागपूर: बहुजननामा ऑनलाईन – महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपानंतर तिन्ही पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत. पण या नाराज झालेल्या नेत्यांना भाजपने आता हात पुढे केला आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना दुय्यम खाते मिळाल्याने ते खूपच नाराज असून ते मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा पक्षात आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना पक्षात आणता येईल, म्हणून भाजपचे प्रयत्न चालू झाले असून भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी वडेट्टीवार यांना योग्य निर्णय घ्यावा. त्यांच भाजपमध्ये स्वागतच आहे, असे म्हणत त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.
‘विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. मात्र इतक्या महत्वाच्या पदावर काम केलेल्या नेत्याला दुय्यम खाती देऊन त्यांचं मनोधैर्य खचवण्यात येत आहे. त्यांना महत्वाचं खात द्यायला हवं होत. दुय्यम खाते देऊन त्यांच्यावर अन्याय झाला आहे’, असे बावनकुळे म्हणाले.
वडेट्टीवार आणि सुनील केदारी यांच्यावर अन्याय झाला असल्याची भावना विदर्भात असून अनेक वर्षांपासून निवडून येत असताना या नेत्यांना पक्षाने दुय्यम खाती दिली, असेही बावनकुळे म्हणाले. विदर्भातील विकासासाठी त्या भागातील मंत्र्यांना सिंचन, जलसंधारण, कृषी यासारखी खाती मिळायला हवी होती. आमच्या सरकारच्या काळात विदर्भाकडे गृह, अर्थ, वन, ऊर्जा यासारखी खाती होती. मात्र यातील ऊर्जा खाते सोडले तर एकही खाते आता विदर्भाकडे नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले.
वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन अशी खाती देण्यात आली आहेत. मागील विधानसभेत विरोधी पक्षनेते असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला अशी दुय्यम खाती देण्यात आल्याने विदर्भातील काही काँग्रेस नेते, कार्यकर्तेही नाराज आहेत, अशी माहिती मिळत आहे.