पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 12 दिवसांनी मोठं विधान केलं आहे. आवश्यकता असल्यास वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं आता राठोडांच्या अडचणीत वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांना माहिती देताना पुणे पोलिसांनी सांगितलं की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्व अँगलनं सुरू आहे. जर गरज पडली तर पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांची चौकशी करण्यात येईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपनं आरोप केला होता की, मंत्री संजय राठोड यांच्या सोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिनं हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणी भाजपकडून पुरावा म्हणून काही ऑडिओ क्लीप्सही देण्यात आल्या आहेत. संजय राठोड आणि अरुण यांच्यात झालेल्या संवादाच्या या क्लीप्स असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान यातील आवाज कोणाचा आहे याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी अरुण राठोड या तरूणाचं नावही प्रखरतेनं पुढं येताना दिसत आहे.
पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू केली जात असल्याची माहिती समोर येताना दिसली. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता, पूजा चव्हाण प्रकरणी अद्याप कुणालाही ताब्यात घेतलं नसल्याचं संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं आहे.