पुणे बहुजननामा ऑनलाईन – वडगाव शेरी येथील अनुप हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉयने डॉक्टर असल्याची बतावणी करत गर्भवती महिलेवर उपचार केल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने महिलेला दुसऱ्या दाखल करावे लागले. त्यानंतर महिला प्रसूत झाली परंतु नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधित वॉर्डबॉय विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरी शंकर ठाकूर (वय ३६, रा. वडगाव शेरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे.महिलेच्या पतीने याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदाराची पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. महिलेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिला तातडीने मध्यरात्री वडगाव शेरी भागातील अनुप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ठाकूरने डॉक्टर असल्याची बतावणी करून महिलेवर उपचार सुरू केले. अतिरक्तस्राव झाल्याने महिलेला तातडीने तेथून हलविण्याचा निर्णय पतीने घेतला आणि मध्यरात्री महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना महिला प्रसूत झाली. मात्र, नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. ठाकूरने डॉक्टर असल्याची बतावणी करून चुकीचे उपचार केल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला, असे महिलेच्या पतीने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर तपास करत आहेत.