Wakad Pune Crime News | पिंपरी : वाकड परिसरात पुन्हा वाहनांची तोडफोड, आठवड्यातील चौथी घटना; स्वयंघोषित भाईवर पोलिसांना डोईजड
पिंपरी : – Wakad Pune Crime News | मागील आठ दिवसांपासून वाकड पोलीस ठाण्याच्या (Wakad Police Station) हद्दीत वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles) करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. परिसरात दहशत माजवण्यासाठी स्वयंघोषीत भाई कडून हातात कोयते आणि रॉड घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांना टार्गेट केलं जात आहे. कोयते आणि रॉड ने वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले जात आहे. वाकड परिसरात मागील आठ दिवसात चार ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्वयंघोषीत भाई पोलिसावर डोईजड झाले असून पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक कमी झाल्याचे दिसत आहे.
गुरुवारी (दि.17) रात्री पावणे अकराच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने एका स्विफ्ट डिझायर (एमएच 14 के.क्यु. 1927) कारची तोडफोड केली. तसेच कार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील दिवसभरात जमलेले 1200 रुपये काढून नेले. याप्रकरणी रावसाहेब गोविंद माने (वय-37 रा. परंडवाल निवास नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
वाकड पोलिसांनी रोहित बबलु सिंग (वय-22 रा. काळेवाडी), चेदन मंगेश गायकवाड (वय-19 रा. विठ्ठल नगर, नेहरुनगर पिंपरी), रोहित राजेश मिश्रा (वय-22 रा. नेहरुनगर, पिंपरी) यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना समजपत्र देऊन नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी आरोपींवर भान्यसं 310(2), 351(2)/(3) सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी त्यांची गाडी पार्क करत असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी कार च्या काचेवर वीट मारुन नुकसान केले. याचा जाबव विचारला असता, तु आम्हाला ओळखत नाही का, आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता कोयता व रॉडचा धाक दाखवून खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. हा प्रकार सुरु असताना परिसरातील लोक त्याठिकाणी जमले. आरोपींनी हातातील कोयता व रॉड हवेत फिरवून येथुन निघून जा, नाहीतर एकेकाला संपवून टाकू अशी धमकी देऊन दहशत माजवली. तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कार, टेम्पो, रिक्षा अशा एकूण नऊ वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
आठ दिवसातील चौथी घटना
वाकड परिसरात मागील आठ दिवसात चार ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. पहिली घटना 10 जुलै रोजी घडली, दुसरी घटना 14 जुलै, तिसरी घटना 17 जुलै रोजी आणि चौथी घटना 18 जुलै रोजी काळेवाडी येथे घडली. एकाच परिसरात अनेक भाई झाल्याने दहशत माजवण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. या घटनांवरुन पोलिसांचा स्वयंघोषित भाईवर वचक राहिला नसल्याचे दिसून येते.
Comments are closed.