बहुजननामा ऑनलाइन टीम – एका व्यक्तीने महिलेचे नकळत अश्लील व्हिडीओ काढून ते महिलेला पाठवले. ते व्हिडीओ इतर ठिकाणी व्हायरल न करण्यासाठी महिलेकडे सहा लाख रुपयांची खंडणी मागीतली. हा प्रकार वाकड येथील रहाटणी येथील शिवराजनगर येथे गुरुवारी (दि.13) रात्री अकराच्या सुमारास घडला आहे.
राजीव पटेल उर्फ राजीव परमार (रा. मगरपट्टा पूर्ण पत्ता माहित नाही) याच्या विरोधात खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका 34 वर्षाच्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या रहाटणी येथील शिवराजनगर येथे वास्तव्यास आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेच्या शरीरसंबंधाचे व्हिडीओ बनवले. ते व्हिडीओ महिलेच्या व्हॉट्स अॅपवर पाठवले. ते व्हिडीओ बाहेर इतर ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडे सहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारानंतर महिलेने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार करीत आहेत.