मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अंबानी स्फोटक प्रकरण, त्यात सचिन वाझेंना झालेली अटक, मनसुख हिरेन यांचा झालेला संशयास्पद मृत्यू आणि आता परमबीर सिंग यांचा गृहमंत्री देशमुखांवर खळबळजनक आरोप यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रोज नवनवे दावे करत ठाकरे सरकारला अडचणीत आणत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने थेट देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. एटीएसने जप्त केलेली ती व्होल्व्हो फडणवीस यांच्या निकटवर्तीयाची असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करणा-या एटीएसने मंगळवारी (दि. 23) पहाटे दमन येथून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीने संशयाची सुई थेट फडणवीसांच्या निकटवर्तीयाकडे वळवली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबूक पेजवरून यासंदर्भातील एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, एटीएसने तपासात जी व्होल्वो कार जप्त केली आहे. ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात, असा संशय या पोस्टमधून व्यक्त केला आहे. याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाजवळची सोन्यासारखी 24 एकर जमीन कवडीमोल दराने दिली होती. इतका हा भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे. फडणवीसांच्या अत्यंत जवळचे असलेले प्रसाद लाड यांचे मनिष भतिजा व्यावसायिक भागीदार असल्याचे समजते, असा दावा राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून केला आहे.