नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील ललितपूर जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याने एका ग्रामस्थाकडून पंतप्रधान आवासच्या नावाखाली 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ग्रामपंचायत अधिकारी आपल्या घरात बनवण्यात आलेल्या कार्यालयात दिसून येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो मद्यपान करतानाही दिसत आहे.
वास्तविक, हे प्रकरण ललितपूरच्या सदर तहसील अंतर्गत असलेल्या नयाखेडा ग्रामपंचायतीचे आहे. जेथे गरीब ग्रामस्थांकडून पंतप्रधान आवासच्या नावाखाली 10 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी अशोक कुमारला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून पीडित व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी धनसिंह पाल यांना सन 2017-18 मध्ये आवास योजनेंतर्गत घर मिळणार होते. परंतु त्यांचे घर काही बांधले जात नव्हते. घर बांधण्यासाठी पैसे काढण्याच्या पहिल्या हप्त्याच्या बदल्यात ग्रामपंचायत अधिकारी अशोक कुमार सतत 10 हजार रुपयांची मागणी करत होता.
यानंतर ग्रामस्थाने व्याजावर 10 हजार रुपये घेतले आणि ते घेऊन 4 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या घरी पोहोचला. तेथे ग्रामपंचायत अधिकारी दारू पित ग्रामस्थांकडून पैसे घेत कार्यालयात काम करताना दिसला. यानंतर पीडित व्यक्तीने आपल्या मोबाईल वरून ग्रामपंचायत अधिकारी अशोक कुमारला लाच म्हणून 10 हजार रुपये देतानाचा व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल केले.
हे प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी दिनेश कुमारने हा व्हायरल व्हिडिओ विचारात घेतला. त्यांनी आरोपी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला त्वरित निलंबित केले आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले.