बहुजननामा : ऑनलाइन टीम – भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सूरू आहे. त्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षातून पक्षांतराचे जास्त प्रमनात होत आहे. त्यामुळे भविष्यात भजपचा कॉंग्रेस होण्याची शक्यता आहे. अशी टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली.
नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते . विरोधी पक्षाचे अस्तित्व सध्या दिसतच नाही , अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात रासपची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे.राज्यात रासप पक्षाचे २ आमदार , ४ नगराध्यक्ष, ६ उपनगराध्यक्ष, ९८ जिल्हा परिषद सदस्य, ३ सभापती, आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला ५७ जागांची मागणी केल्याचे जानकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी १२० कोटींवरून , ७ हजार ५०० कोटींवर गेले आहे.तर विदर्भातील दूध उत्पादन दहा हजार लिटरवरून सध्या साडेचार लाखांवर गेले आहे. केंद्रातही स्वतंत्र पशुसंवर्धन विभाग निर्माण करण्यात आला. त्यामुळे आम्हाला पुन्हा पाच वर्ष संधी मिळेल, अशी आशा जानकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी मुंबई मधील मेळाव्या संदर्भात देखील माहिती दिली. २५ ऑगस्टला मुंबईत रासपचा वर्धापन दिन असल्याने, सुमारे १० लाख कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली.