नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आणि संताप अद्याप शांत झालेला नसताना पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची तुलाना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचा वादग्रस्त प्रकार घडला आहे. सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असून याच पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहर्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा तर तानाजी मालुसरे यांच्या चेहर्यावर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन दिल्ली निवडणुक 2020 असे नाव देऊन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
https://twitter.com/PoliticalKida/status/1218827562035466240
या व्हिडिओमध्ये तानाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील शरद केळकरच्या चेहर्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. तर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेतील अभिनेता अजय देवगणच्या चेहर्यावर अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तर उदयभान राठोडच्या भूमिकेतील सैफ अली खानच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. या व्हिडिओवरुन शिवप्रेमींमध्ये पुन्हा संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा वाद वाढणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या व्हिडोओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हा व्हिडिओ मी संभाजी भिडेंसह भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवला आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया देतात हे मला पाहायचे आहे. शिवसेनेच्या विरोधात आवाज उठवणार्या सर्व संघटना आता कुठे गेल्या, असा रोखठोख सवाल राऊत विचारला आहे.
यापूर्वी सुद्धा भाजपाच्या जयभगवान गोयल यांच्या आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, गोयल यांनी नंतर ते मागे घेतले नसल्याचे सांगितले. यावर आवाज उठविणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे भाजपाचे नेते आणि संजय राऊत असा वाद रंगला होता. भाजपाच्या राम कदम यांनी तर संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत साकीनाका पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यांनतर संभाजी भिडे यांच्या संघटनेने सातारा, सांगली बंदचे आवाहन करत राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आता पुन्हा एकदा दिल्ली निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपतींची तुलना केली गेल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 8 फेब्रुवारीला होणार्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमुळे सध्या राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 11 फेब्रुवारीला होणार आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष भाजपामध्ये या ठिकाणी प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे.
Visit : bahujannama.com