बहुजननामा ऑनलाइन टीम – एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. माझ्याकडे काही लोकांच्या व्हिडीओ क्लिप्स, कागदपत्रे आहेत, ती समोर आली तर हादरा बसेल. मात्र मी इतक्या खालच्या पातळींचं राजकारण करत नाही. मी वरिष्ठांना ते दाखवलं आहेत. त्यांच्या सारख्या चुका मी केल्या नाहीत, असे खडसे म्हणाले. या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर त्या बाबी मांडल्या आहेत. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन. त्यामुळे काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे होईल ते जनतेसमोर होईल असा इशाराही त्यांनी दिला.
यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले की, नाथाभाऊंनी त्यांच्याकडे असलेले भाजपच्या कोणत्यातरी नेत्यांचे व्हिडीओ क्लिप व फोटो देशहितासाठी जनतेसमोर आणले पाहिजेत. त्यांच्या गप्प राहण्यामुळे भाजपच्या माध्यमातून जनहितविरोधी व ज्यांचे चरित्र संशयास्पद आहे असे नेतृत्व जनतेवर लादले जात असेल तर ते उचित नाही, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
कन्येची शपथ घेऊन फडणवीसांनी दिली राज्यपालपदाची ऑफर
एकनाथ खडसे म्हणाले, मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटीचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं होतं, असे खडसे यांनी म्हटलं आहे.
राज्यसभेत पाठवण्याचे आश्वासन
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीही हरकत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितलं. पण नंतर चार दुसरीच नावं आल्याचे खडसे यांनी सांगितले.