अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – शरद पवारांनी ’50 वर्ष अविरतपणे जनतेची कामे सातत्याने केली आहे, आपण घरांमध्ये देखील ज्येष्ठ माणसाचा कुठलाही अनादर करत नाही. त्यामुळे त्यांनी चुकीचा शब्द वापरल्यामुळे त्यांनाही चुकीला चूक सांगणे गरजेचे आहे, चुकीला चूक म्हणणे हे संस्कार आपल्याला दिल्या गेल्यामुळे पडळकरांचे वक्तव्य हे चुकीचेच आहे’ असे म्हणत भाजपचे नेते वैभव पिचड यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.
भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद महाराष्ट्रात राज्यभर उमटल्याचे पहायला मिळाले. मात्र, पडळकरांचे हे वक्तव्य त्याचे व्यक्तिगत मत असल्याचं सांगत भाजपने देखील या प्रकरणातून आपले हात झटकले. परंतु, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या भाजप नेते वैभव पिचड यांनी पडळकरांना घरचा अहेर दिला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहे. गेल्या 40 वर्षांपासून त्यांनी जनतेसाठी कामं सातत्याने केल्याचे त्यांनी सांगितले.
वैभव पिचड यांचे पिता व माजी मंत्री मधुकर पिचड हे भाजपामध्ये ज्येष्ठ नेते जरी असले तरी त्यांनी देखील पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालत्या पातळीवर शरद पवार यांच्यावर केलेली टीका माझ्या मनाला दुख देणारी आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भडक बोलणे ही फॅशन झाली आहे. शरद पवारांवर टीका ही दुर्दैवी आहे, असे मत पिचड यांनी व्यक्त केले होते.