नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनची वाढती दादागिरी पाहून अमेरिकेनंही आता कठोर भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युरोपमधून सैन्य काढून आशिया खंडात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने जर्मनीमधून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीमध्ये तैनात असलेल्या 9 हजार 500 सैनिकांना अमेरिका आशिया खंडात तैनात करणार आहे. सध्या भारत चीन सीमेवर तणाव आहे आणि अशा परिस्थितीत अमेरिकेकडून हे पाऊल उचलले जात आहे.
भारत आणि आग्नेय आशियासाठी चीन धोका बनला असल्याचे मत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी व्यक्त केले आहे. भारत, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपिन्ससारख्या आशियाई देशांना चीनकडून धोका आहे. या धोक्याकडे पाहता अमेरिका जगभरात सैन्याच्या तैनातीचा आढावा घेत आहे आणि त्यांना अशा प्रकारे तैनात करत आहे की गरज पडल्यास ते पीपल्स लिबरेशन आर्मीचा सामनाही करू शकतील, असे पॉम्पिओ म्हणाले.
जर्मन मार्शल फंडच्या ब्रुसेल्स फोरम 2020 मध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. आम्ही अशा प्रकारे सैन्य तैनात करू की पीएलएचा आम्हाला सामना करता येईल. हे आमच्यासाठी एक मोठे आव्हान आहे. त्यास सामोरे जाण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनुसार सैन्याच्या तैनातीचा आढावा घेण्यात येत असून या योजनेंतर्गत अमेरिका जर्मनीमधील जवानांची संख्या 52 हजार वरून 25 हजारांवर आणणार आहे, असंही पॉप्मिओ यांनी स्पष्ट केले आहे.