नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने इराकमध्ये लागोपाठ दुसर्या दिवशी हवाई हल्ला केला आहे. उत्तर बगदादमध्ये ताजी रोडजवळ शनीवारी सकाळी (भारतीय वेळेनुसार) केलेल्या हल्ल्यात एकुण सहा जण ठार झाले. हा रोड विनाअमेरिकन लष्करी तळाकडे जातो. यापूर्वी शुक्रवारी बगदाद विमानतळावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी ठार झाला होता. इराकच्या सरकारी अधिकार्यांचे म्हणणे आहे की, हवाई हल्ल्यात दोन कारवर निशाणा साधण्यात आला. ज्यामध्ये इराण समर्थक योद्धे होते. या हल्ल्यात हशद-अल-साबीचे 6 योद्धे मारले गेले. सध्यातरी हल्ल्यात मारले गेलेल्यांची ओळख पटलेली नाही. अहवालानुसार अमेरिकेने या हल्ल्यात इराकच्या हशद-अल-साबीच्या कमांडरच्या पथकावर निशाणा साधला.
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी शुक्रवारी रात्री उशीरा इराणी जनरल विरूद्धच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की जनरल कासिम सुलेमानीला मारण्याचा निर्णय इराण आणि अमेरिकेमध्ये संभाव्य युद्ध थांबविण्यासाठी घेण्यात आला, युद्ध सुरू करण्यासाठी नाही. ते म्हणाले, अमेरिकेच्या सैन्याने केलेल्या अचूक हल्ल्यात जनरल सुलेमानी ठार झाला. याबरोबरच या क्षेत्रातील दहशत नष्ट झाली आहे. इराणी जनरल अमेरिकन मुत्सदी आणि सैनिकांवर हल्ला करण्याचा कट रचत होता, परंतु, आम्ही त्याला पकडले आणि ठार केले.
पश्चिम आशियात अमेरिका पाठवतेय आणखी तीन हजार जवान
अमेरिकेच्या हल्ल्यात इराणी जनरल मारला गेल्यानंतर उत्पन्न झालेल्या स्थितीचा विचार करून पश्चिम आशियात अमेरिका तीन हजार सैनिक आणखी पाठवत आहे. ही माहिती सुरक्षा अधिकार्यांनी शुक्रवारी दिली. अधिकार्यांनी ज्या निर्णयाबद्दल सांगितले त्याबाबत पेंटॅगनमध्ये अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. या अधिकार्यांच्या माहितीनुसार हे सैनिक उत्तर कॅरोलिनाच्या फोर्ट ब्रॅगच्या 82 व्या एयरबॉर्न डिव्हिजनचे आहेत. हे सैनिक 82 व्या एयरबॉर्न डिव्हिजनच्या त्या 700 सैनिकांच्या अतिरिक्त असतील ज्यांनी इराण समर्थक मिलिशियाचे लोक आणि त्यांच्या समर्थकांद्वारे बगदादमध्ये अमेरिकन दुतावासवर हल्ला केल्यानंतर या आठवड्याच्या सुरूवातीला कुवेतमध्ये तैनात केले होते.
हल्ल्यात डॉक्टरही मारले गेले
हशद-अल-साबी ज्यास पॉप्युलर मोबिलायजेशन फोर्स (पीएमएफ) च्या नावाने ओळखले जाते त्याने हे वृत्त नाकारले की, पथकात त्याचा वरिष्ठ कमांडरही होता. हल्ल्यात मारले गेलेल्या सहा लोकांमध्ये डॉक्टरही होते. अहवालानुसार तीन लोक गंभीर जखमी झाले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ताजी रोडपासून काही अंतरावरच अमेरिकन नसलेल्या सैनिकांचा तळ आहे. ज्यामध्ये ब्रिटिश आणि इतालवी जवानांचा समावेश आहे.
पोलीस सुत्रांनुसार हवाई हल्ल्यात हशदच्या एका पथकावर निशाणा साधण्यात आला. ज्यामध्ये एकुण सहा जणांचा मृत्यू झाला आणि काही लोक जखमी झाले. पीएमएफ इराकी योद्ध्यांची संघटना आहे. पीएमएफ इराकच्या लष्कराप्रमाणे इराकी मिलिशियांचा एक भाग आहे. या हल्ल्यामुळे मध्य पूर्व भागातील तणाव आणखी वाढला आहे. इराणी कमांडर जनरल सुलेमानीला अमेरिकेने ठार केले आहे. यापूर्वी बगदाद विमानतळावर अमेरिकन लष्कराने केलेल्या मिसाईल हल्ल्यात इराणच्या कमांडरसह आठ लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये तणाव आणखी वाढला आहे. तसेच इराकशीही अमेरिकेचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात अमेरिकेने कमीत कमी तीन मिसाईल सोडले, ज्यामध्ये बगदाद विमानतळावर भिषण स्थिती निर्माण झाली. मोठ्याप्रमाणात इराण आणि हिज्बुल्लाहच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या हल्ल्यात कमांडर कासिम सुलेमानी ठार झाला.
सुलेमानीच्या मृत्यूनंतर ईराण भडकला
सुलेमानी मारला गेल्यानंतर इराण भडकला आहे. त्याने अमेरिकेला धमकी दिली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद जरीफ यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. जरीफ यांनी ट्विट करून म्हटले की, अमेरिकेने जनरल सुलेमानी यांच्यावर हल्ला करण्याचे आणि त्यांची हत्या करण्याचे आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे पाऊल खुपच धोकादायक आणि मुर्खपणाचे आहे. त्यांचे बळ प्रभावीपणे दाएश (आयएसआयएस), अल नुसराह, अल कायदा एट अलशी लढत होते. अमेरिकेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
Visit : bahujannama.com