भोकर : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय बौद्ध महासभेच्या भोकर तालुका शाखेच्या वतीने होणाऱ्या उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरास पंचशील बुद्धविहार येथे प्रारंभ करण्यात आला. प्रा. आप्पाराव येरेकार अध्यक्षस्थानी होते. बौद्ध सभेच्या जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. एम. एन. शिंगे, माधवराव सर्पे, कौशल्या परघाणे, लता शिदे, केंद्रीय शिक्षिका सुजाता आढाव, बी. ए. जंगमे यांची उपस्थिती होती. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बौद्ध उपासिकांना प्रबुद्ध सुसंस्कारित तथा सच्चीबौद्ध उपासिका बनवण्यासाठी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी नव्हे, तर जिच्याकडे धम्माची शिदोरी ती जगाचा उद्धार करू शकते असे सांगून महिलांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. प्रा. येरेकार यांनी शिबिरात सहभागी महिलांना धम्माचे आचरण करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक बी. एस. सरोदे यांनी केले. पी. एम. तोडे यांनी सूत्रसंचालन केले. यू. एन. येडके यांनी आभार मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कविता गोवंदे, करुणा लोमटे, भारतीबाई राव, कांताबाई वाघमारे, ज्ञानगंगा तोडे आदी प्रयत्न करत आहेत.