नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी या तिघांना निलंबित करण्यात आळ्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांना भाजपने पक्षातून काढून टाकल्याचे वृत्त आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेचा अपघात झाल्यानंतर त्यात तिची काकू आणि मावशी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी २ महिला पोलीस कर्मचारी आणि १ पुरुष पोलीस कर्मचारी अशा तिघांना निलंबित करण्यात आले आहे. ते तिघे अपघाताच्या दिवशी सुरक्षेसाठी तैनात केलेले असताना गैरहजर होते. त्यामुळे निष्काळजीपणा केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
याप्रकरणात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाशी संबंधित सर्व केसेस उत्तर प्रदेश बाहेर चालविण्याचे आदेश दिले आहेत. तर याप्रकरणाच्या तपासाचा स्टेटस अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.