पुणे / पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपुर्वी विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर एकाने घरात घुसून चाकूने वार केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निगडी येथे घडली आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्लेखोर हा माथेफिरू असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
अजय शेगटे (28) असं त्याचं नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कुलकर्णी यांच्या वडिलांचे घर निगडी प्राधिकरणातील सेक्टर नंबर 25 मध्ये आहे. हल्लेखोर शेगटे हा सकाळी सात-साडेसात वाजण्याच्या दरम्यान कुलकर्णी यांच्या घरात शिरला. त्यावेळी सोनालीच्या वडिलांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिकार करत असताना अजयने त्यांचवर चाकूने वार केला. त्यामध्ये कुलकर्णी हे किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्रूान, आजु-बाजूच्या लोकांना याघटनेची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने झटापट केली पण अखेर त्याला पकडण्यात आले. अजयला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नटरंग फेम सोनाली कुलकर्णीचा नुकताच विवाह झाला आहे. घडलेल्या घटनेबाबत पोलिस सविस्तर तपास करीत आहेत.