बहुजननामा ऑनलाइन टीम – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी प्रसिध्द आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी पर्यावरणाला प्रदूषित करणाऱ्या 8 वर्षापेक्षा जुन्या वाहनांवर “ग्रीन टॅक्स” वसूल करण्याचा निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यानंतर गडकरी यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशात सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी केलेल्या 15 वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याचे धोरण लवकरच अधिसुचित केली जाणार आहे. त्यामुळे 1 एप्रिल 2022 पासून जुनी वाहने भंगारात काढली जाणार आहेत.
प्राथमिक टप्प्यात सरकारी वाहने आणि पीएसयू वाहनांवर ही कारवाई केली जाणार आहे. 15 वर्षांपेक्षा जुनी झालेली वाहने स्क्रॅपमध्ये काढता येणार आहेत. 2022 पासून हा नियम लागू होणार असल्याने ही जुनी वाहने फारतर आणखी सव्वा वर्ष वापरता येणार आहेत. महत्वाचे म्हणजे गडकरी आणि केंद्र सरकार सरसकट 15 वर्षे झालेल्या ट्रान्सपोर्ट आणि खासगी वाहनांसाठीही स्क्रॅप पॉलिसी लागू करण्याच्या विचारात आहे. असे झाल्यास १५ वर्षे झाल्याझाल्याच वाहन भंगारात काढावे लागणार आहे.
खरे तर यासाठीचे पहिले पाऊल केंद्र सरकारने 26 जुलै 2019 मध्येच उचलले होते. देशात इलेक्ट्रीक वाहनांना बूस्ट देण्यासाठी 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यास मंजुरी देण्यासाठी मोटर वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता त्याची हळूहळू अंमलबजावणी केली जात आहे.