बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राबरोबरच बेळगाव शहरात देखील उमटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी बेळगाव शहरात मराठी भाषिकांनी लावलेले फलक पोलिसंनी हटवले. यातून कर्नाटकी पोलिसांची दडपशाही पुन्हा एकदा दिसून आली आहे. कर्नाटकी पोलिसांच्या या कारवाईवर मराठी भाषिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे फलक बेळगाव शहरात मराठी भाषिकांनी लावले होते.
यावर कर्नाटकी पोलिसांनी दडपशाही करत धर्मवीर संभाजी चौकात लावलेले फलक हटवले. एवढेच नाही तर कन्नड संघटनांकडून चंदगडच्या आमदार राजेश पाटील यांचे पोस्टर जाळण्यात आले. सेंट झेव्हियर्स शाळेसमोर आमदार पाटील यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगड विधानसभा मतदारसंघातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश पाटील यांनी गुरूवारी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली.
शपथ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे, अशी मागणी केली. त्यानंतर ‘जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सीमाबांधव!’ अशा घोषणा दिली होती. या घोषनेनंतर सीमाभागात राहणाऱ्या मराठी बांधवांनी आनंद व्यक्त केला. मात्र कन्नड संघटनांमध्ये याविषयी तीव्र संताप दिसून आला असून बेळगावातल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील यांचा फोटो जाळून त्यांचा निषेध केला आहे.
Visit : bahujannama.com